सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

निराधार

ह्या गॉडफॉरसेकन् (god-forsaken) देशात दरदिवशी काहीतरी नवीन स्कीम्स निघत असतात, निराधार कार्ड त्यातलीच एक,

आणि पिसाळल्यासारखं सरकार सगळीकडे हे निराधार कार्ड जोडत बसले आहे.

ठाण्यात पहाटे साडेचारपासून निराधार केंद्राबाहेर रांग लागते. लोकं उभी राहतात. अचानक कुठूनतरी एक माणूस प्रगट होतो (या माणसाचा निराधार केंद्राशी काही संबंध नाही) आणि रांगेतल्या माणसांना क्रमांक देतो. एकदा का तीस; --हो तीस; थर्टी; ३०- एक मशीन = तीस होमो सेपियन्स--- माणसे भरली की मग बाकीच्यांनी घरी जायचे.
तुम्ही मागल्या जन्मी प्रचण्ड म्हणजे प्रचण्ड पुण्य कमावले असेल तर निराधार केंद्रात दोन मशीन्स चालू असतात मग साठ माणसांना सदेह स्वर्गात जाण्याची संधी मिळते.

जेंव्हा ही गुड फॉर नथिंग स्कीम आली तेंव्हा विचार केला की कोण रांग लावणार एवढी लांबलचक? थोड्या दिवसांनी आटोक्यात येईल.
मग कर्मभोग भोगू. फक्त पत्ता सिद्ध करायला इतर भरपूर गोष्टी आहेत.

बट आय वॉज राँग...
पिसाळल्यासारखं सरकार सगळीकडे हे निराधार कार्ड जोडत बसले आहे.

त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र झाले आहे. पण हा पिसाळलेपणा तेवढ्यापुरता मर्यादित नाही. सुरुवातीस संख्येनी कितीतरी असलेली निराधार केंद्रे "अशीच आपली काहीतरी गंमत रे" म्हणून बंद करून टाकली आहेत.
काय मज्जा!

ठेचे-ठेचेला सर्वत्र या निराधार पिशाच्च्याचा संचार चालू आहे.
पण ते कुठेच मिळत नाही.
आहे; पण दिसत नाही.

वरती सांगितलेल्या साठ किंवा तीस सदेह स्वर्ग प्रवेश केलेल्या मानवदेहांना फायनली तरी ते मिळते की नाही माहित नाही.
सगळा घोळ ह्या बायोमेट्रिक मशीन्समुळे झाला आहे. बायोमेट्रिक मशीनचा त्या निराधार कार्डाच्या ओळख क्रमांकाशी काय संबंध?
नुसती तुम्हाला माणूस-अंक जोडणी करायची आहे तर तेवढा अंकच द्या इतर बायोमेट्रिक उद्योग कशाला? हे उद्योग करायचेच असतील तर नंतर सावकाशीने करत बसा.
सर्वसामान्य माणसांना किती गृहीत धरणार?

निदान जिथें जिथें हे निराधार पिशाच्च जोडलेले आहे तिथे तिथे तरी हा बायोमेट्रिक मांत्रिक बसवा.
म्हणजे सगळ्या मोबाईल गॅलऱ्या, सगळ्या बॅँका, सगळ्या शाळा, सगळे गॅसवितरक, जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी. डी-मॉनीटायझेशन नावाचा अघोरी प्रकार करून झाला.
त्यानंतर हे भूत!
खरेतर अगोदर पासून होते म्हणा फक्त ते बाटलीत होते. आता बाहेर आले आहे.
अर्थात हे भूत-पिशाच्च सर्व बंगाली बाबांच्या आवाक्यात असणार.

फक्त
आम्हा नियम पाळणाऱ्या--महाभुक्कड--नाकासमोर चालणाऱ्या, मध्यमवर्गीय जनतेला मात्र शिक्षा करा-

मुकी बिचारी, कुणीही हाका!

Not at all Happy reading n writing!

ता.क. निराधार कार्डासाठी आणखी काही भयप्रद व तणावपूर्ण गोष्टी अनुभवास आल्यावर एक दिवस अचानक; राक्षसी शक्तीवर दैवी शक्तीने विजय मिळविला.

एक टेम्परवारी निराधार केन्द्र सापडले.

ते टेम्परवारी आणि नवीनच असल्याकारणाने तिथे होमो सेपियन्स संख्येने कमी होते.
त्यामुळे ब्राह्ममुहुर्तावर रांग न लावताही, २/३ तासात का होईना प.....ण का......म झा.......ले.
शिवाय महिन्याभरात सर्व अघोरी प्रकार बंद होऊन आटोक्यात आले आणि सर्वत्र आनंदी, मंगलमय व प्रसन्न वातावरण भरून राहिले.