रविवार, ३१ जानेवारी, २०१६

अस्ताव्यस्त जाडेपणा (३)

     इथे गरीब म्हणजे भिकारी असा अर्थ घेतलेला नाही तर जे श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीय नाहीयेत ते गरीब हा अर्थ घेतला आहे. त्या गरिबांनी रोजच्या रोज दिवसातून तीनदा असे काहीतरी जंक खाल्ल्यावर शरीर वाटेल तसे सुटायला लागते. खाऊन पिऊन सुखी असलेले ओव्हरवेट भारतीयसुद्धा अशा लोकांपुढे अतिशय बारीक दिसतात.
     मग जाडेपणा नंतरचे सर्व रोग दारात रांग लावून उभे राहतात त्यात टाईप टू डायबेटीज, हृदयरोग, कॅन्सर इत्यादी दिग्गज रोग असतात. अमेरिकेतली गरीब राज्ये टक्केवारीने सर्वात जास्त जाडी माणसे असणारी आहेत. याच कारणांमुळे शाळांतही मुलांना हेल्दी म्हणजेच जंक नसलेलं जेवण पुरविले जाते. ( बहुतेक; मुलांना घरून हेल्दी डबा मिळेलच ह्याची खात्री नसावी) सर्वेक्षण करून पंचवार्षिक पथ्य योजना जाहीर केल्या जातात. जनतेची जागरुकता वाढविली जाते. अमेरिकेल्या दुकानात जे अन्नपदार्थ ठेवले असतात त्यावर न्युट्रिशन इन्फॉर्मेशन म्हणूनच लिहिली जाते की जनतेला चांगले/वाईट पदार्थ ओळखता यावेत. जेणेकरून आरोग्यदायी पदार्थांची निवड केली जावी.

     आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा:

     अमेरिकेचे अंधानुकरण कसें करावे? अमेरिकेकडून वाईट गोष्टीच कश्या शिकाव्यात?

     यासाठी भारतातला एक मोठा कुशिक्षित वर्ग पारितोषिक-पात्र आहे. खरेतर अमेरिकेत चांगल्या गोष्टीही आहेत पण हे कबुल करण्याची आणि नंतर त्या गोष्टी अंगी बाणविण्याची इच्छा असेल तर ते शक्य होणार. असो. ह्या लेखातून अमेरिकेच्या दोन्ही; चांगल्या आणि वाईट बाजू दिसल्या असतील. आशा आहे की चांगले तेच पसरेल.
     जे फास्ट/जंकफूड A.K.A. कचरान्न म्हणून अख्ख्या जगात बदनाम झाले आहे तेच भारतात या वर्गाकडून ग्लॅमराईज्ड केले गेले आणि केले जात आहे. अर्थात हा बुद्धिभेद करण्यात कचरान्न विकणाऱ्या ब्रँड्स्चाही महत्त्वाचा वाटा आहे. कचरान्नात पिझ्झ्यावर चीझ, बर्गरमध्ये चीझ, पास्त्यात चीझ, टाकोजवर चीझ असे सगळीकडे चीझच चीझ आणि मैदाच मैदा असतो. (ज्यात मीठ आणि साखरही लपून बसले असतात.)
     इटालियन आणि मेक्सिकन; त्यांचे पोळी-भाजी, वरण-भात असलेले पास्ता/टाकोज अमेरिकेने प्रोसेस्ड चीझ घालून नासवले म्हणून वैतागले आहेत. उद्या आपल्याही भारतीय भाजीत चीझ घातले तर कसें वाटेल? किंवा पराठ्यात भाज्या सोडून मैद्याचा चीझ पराठा केला तर कसें होईल? बरे ते चीझही प्रोसेस्डच असते. ते खऱ्या चीझच्या पासंगालाही पुरत नाही.

Rethink your drink
     अजून एक; कुठलेही सोडा असलेले शीतपेय सामान्य तापमानाला आणून ठेवा आणि चाखून बघा त्यात किती साखर असते ते. आपोआपच डोळे उघडले जातील. त्यात हॉटेलमध्ये मिळणाऱ्या आणि साखर घालून अतिगोड केलेल्या फ्रुटज्यूसच्या दहापट तरी साखर असते.
     जे कचरान्न अमेरिकेत गरिबांना परवडते ते आपल्या इथे श्रीमंत/उच्च मध्यमवर्गीय कुशिक्षितांनाच परवडते. त्यामुळे येत्या काही वर्षांत भारतात खाऊन पिऊन सुखी असलेले कुशिक्षित-श्रीमंत/मध्यमवर्गीय- चीझ, मैदा, आणि साखरेमुळे विचित्रपणे सुटलेले बघण्याची तयारी ठेवा.
     इथे गरीब(जे श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय नाहीत ते) अर्धपोटी, वडापाव किंवा घरचे अन्न खाऊन राहतात. देवाच्या दयेने वडापावात चीझ घालण्याची युक्ती सफल झाली नाहीये. शिवाय बऱ्याच (शिक्षित आणि जागरूक) घरी कष्ट करून तयार केलेल्या पारंपारिक भारतीय पाकसिद्धीला (म्हणजेच ---
पोळी = होल व्हीट ब्रेड, 
भाजी = वेजीज, 
आमटी = लेंटील/वेजी सूप, 
भात(लाल/ब्राऊन) = होल ग्रेन, 
कोशिंबीर = सॅलड, 
उसळी = लेग्युमज्
इन शाॅर्ट- वर सांगितलेली अमेरिकन पंचवार्षिक पथ्य योजना.)
आणि तो पाक सिद्ध करणारीला योग्य ते महत्त्व आणि आदर आहे. त्यामुळे अमेरिकेसारखे आपल्या डोक्यावरून अजूनतरी पाणी गेले नाहीये. पण ही दोन्ही कारणे नामशेष झाली की ते लवकरच जाईल. जगभरात जिथें जिथें पारंपारिक पाककला नष्ट झालीये किंवा महत्त्व घालवून बसलीये तिथे तिथे ओबेसिटी 'आ' वासून अवाढव्य ओंगळवाणी पसरलेली आहे.
     ह्या लेखात मारुतीच्या शेपटासारखे(ओबेसिटीसारखे नाही) वाढत जाण्याचे सामर्थ्य आहे त्यामुळे एवढ्यातच आटोपते घेते. नमस्कार. Happy healthy Eating!

संदर्भसूची:
http://nifa.usda.gov/topic/obesity
http://www.reuters.com/article/us-obesity-usa-idUSTRE50863H20090109
http://calorielab.com/news/2015/10/31/fattest-states-2015/
http://stateofobesity.org/rates/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा